11 May 2016

#लेखनस्पर्धा पु.ल. विशेषांक

मित्रांनो,

या वेळी लेखनस्पर्धेच्या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत एक लाडका विषय. पु.ल. देशपांडे. १२ जून २००० हा दिवस मराठी माणसाच्याच नव्हे तर चक्क मराठीच्याही डोळ्यात पाणी ठेवून गेला. मराठीच्या चेहऱ्यावरचे स्मित ज्या दिवशी मावळले तो हा दिवस.

#लेखनस्पर्धा घेण्याच्या निमित्ताने आम्ही पुलंच्या लेखनाचा उत्सव साजरा करीत आहोत. 
यांच्या साहित्याला डोक्यावर घेऊन नाचताना मराठी माणसाला चक्क विठ्ठलाच्या पायाची विट झाल्याचा आनंद मिळावा इतका लळा यांनी आपल्या लेखणीने व लोभस व्यक्तिमत्वाने मराठी मनाला लावला. परदेशातील एखादी सुंदर ललना जशी ‘नथ’ लावल्यावर अधिक सुंदर दिसू लागते; आपलीशी,आपल्यातलीच जाणवू लागते; तसेच अनेक इंग्रजी साहित्यकृतींना यांनी मराठीची ‘नथ’ देऊन अधिक सुंदर केले. आपलेसे केले. यांचे साहित्य निखळ आनंद तर देतेच पण प्रबोधन देखील करणारे आहे.

लेखन, कथा कथन, उत्तम वक्ता, अभिनेता, संगीत, व्यक्तिचित्रे, नाटक, गायन, अनुवाद, तत्वज्ञान असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तीमत्वात होते. त्यात ते निष्णात होते. स्वातंत्र्यानंतर दूरदर्शन सुरु झाले तेव्हा त्यावर सर्वप्रथम पंडित नेहरूंची मुलाखत घेण्याची योग्यता असणारे आपले पुलं नंतर अनेक शिखर सर करत गेले. तेही धाप न लागता. हसतमुख.

पु.ल आपल्याला पहिल्यांदा भेटले असतील ते शाळेच्या मराठीच्या धड्यातून. पण त्यांना प्रत्यक्ष भेटता आले नाही हि खंत नेहमी राहील. आता या लेखन स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही ‘पुलप्रेमींना’ एकत्रित करून पुलंच्या लेखानानंदाचा सोहळा साजरा करणार आहोत.
 

विषय व त्यांची माहिती.

१. पुलंना पत्र लिहा-

तुम्ही पुलंच्या लेखनाचा कलाकृतींचा आनंद नक्कीच घेतला असेल त्या बद्दल त्यांना धन्यवाद द्यायचे अनेकदा मनात आले असेल. पण ते हयात नाहीत यामुळे मनातील भाव तसेच सजवून ठेवून तुम्ही त्यांच्या लेखनपुष्पांतील आनंद लुटला असेल. त्या भावनांना मनातील कृतज्ञतेला शब्दरूप द्या. पुलंना पत्र लिहा.

२. पु.ल. देशपांडे - एक अष्टपैलू (लाडके) व्यक्तिमत्व-

पुलंना अनेक कला अवगत होत्या. त्यांचे लेखन, कथा कथन, संगीत, गायन या अशा अनेक कलांमध्ये त्यांनी अजरामर कृती तयार करून ठेवल्या आहेत. त्यांच्या या व्यक्तिमत्वाच्या प्रयेक पैलूचा आनंद साजरा करूया. इतरांना तुमच्या लेखाने अनेक अज्ञात गोष्टी कळतील.

३. मला समजलेले पु.ल.

पु.ल म्हणजे नुसते ‘बटाट्याची चाळ’ किंवा ‘व्यक्ती आणि वल्ली’ नव्हे. त्यांनी प्रवासवर्णने लिहिली, भाषांतरे केली, गाणी लिहिली, त्यांना चाली दिल्या(इंद्रायणी काठी... हि त्यांचीच अजरामर कृती), व्याख्याने दिली, त्यांच्या ‘एक शून्य मी’ या पुस्तकाने तर मला एका प्रबोधनकारक पुलंची ओळख झाली. त्यांचे प्रत्येक पुस्तक, आपल्याला नव्या पुलंची भेट घडवून देतात. तुम्हालाही पु.ल नव्या रुपात भेटतील. तो अनुभव आम्हाला लिहून पाठवा.

४. ‘व्यक्तिरेखा’ तयार करा-

पुलंनी मराठी माणसाला भेट दिलेल्या या सर्वात सुखद आणि आपल्या जगण्याचा भाग झालेल्या अनेक व्यक्तिरेखा अविस्मरणीय आहे. मग तो नाथा कामात, हरी तात्या, चितळे मास्तर, नामू परीट, पेस्तन काका अशा अनेक व्यक्तिरेखा पुलंनी आपल्याला भेट दिल्या आहेत. पण व्यक्तिरेखा निर्माण करणे सोपे नाही. आपल्या अनुभव विश्वात किंवा कल्पना विश्वात जन्मलेल्या, स्वभाव वैशिष्ट्यांनी अनोखे पण वाचणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याच आयुष्याचा भाग वाटणाऱ्या व्यक्तींचे चित्रण करणे आव्हानात्मक असते. तुम्ही हे आव्हान स्वीकारावे व प्रामाणिक प्रयत्न करावा यासाठी हा विषय निवडला आहे.

५. सुनिता देशपांडे आणि भाई-

अर्धांगिनी, सहचारिणी, आणि भाईंच्या (पु.लंच्या )यशस्वी जीवनाची इतकी मोठी भव्य वास्तू उभी राहिली ती मुळात त्यांच्या पत्नी सुनिता देशपांडे यांच्यामुळेच. पुलंच्या ‘मोठं व्हायचंच नाही’ या स्वभावामुळे त्यांना आई होण्यासाठी मुल जन्माला घालण्याची कधी गरज वाटलीच नसावी. कारण पुलं कधी मोठे झालेच नाहीत. त्यांच्या सवयी व त्यांच्या व्यक्तिमत्वातील नाजूक वळणांवर प्रकाश पाडला असता सुनिताताई शिवाय पुलंनी कसं जमवलं असतं? हा प्रश्न पडतो. सुनिता देशपांडे या पुलंच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून त्यांच्या शिवाय लेखनस्पर्धा निरर्थक ठरली असती. नक्की वाचा- ‘आहे मनोहर तरी’. तुमची लेखणी नक्कीच प्रतिसाद देईल.

६. पुस्तक अभिप्राय-

पु.ल. देशपांडे यांच्या अनेक पुस्तकांचा अनुभव आपण घेतला असेल, अनेक पुस्तके आपल्या संग्रही असतील. क्षीण मनस्थितीत अनेकांना हि पुस्तके औषधासारखी आहेत. तुम्ही वाचलेल्या अशाच पुलंच्या पुस्तकांचा अनुभव तुम्ही मांडावा व अनेकांना त्या पुस्तकाला वाचायला प्रवृत्त करावे या साठी हा विषय निवडला गेला आहे.

७. नव्या पिढीला पुलं (कसे) कळतील?

शाळा, शेजार, मित्र मैत्रिणी, कुटुंब, समाज माध्यमे या सर्व मार्गांनी मराठीच्या बदलत्या (घसरत्या) रुपात वाढलेल्या पिढीला साहित्याचा, भाषेचा निखळ आनंद घेता येणे कठीण होत चालले आहे. विनोद समजायला त्यांना त्या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तर आपल्या या पिढीपर्यंत हा निखळ आनंद पोचवायचा कसा? काय काय करता येईल? तुमच्याकडून ऐकायचे आहे. लिहाल ना?

८. पुलंचे विनोद आणि सध्याचे विनोद- काय फरक आहे?

पुलंना कधीही कमरे खालचे विनोद किंवा एखाद्याच्या शारीरिक व्यंगावर खिल्ली उडवण्याच्या पद्धतीने किंवा ‘डबल मिनिंग’ यांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या नाहीत. म्हणून त्यांची विनोदनिर्मिती हि निखळ आनंद देते समाजामध्ये थट्टा किंवा विद्रूप देहभोली यांवर आधारित विनोदाचेच  ‘व्यंग’ सहन करावे लागते. त्यातून क्षणिक हसू येते पण मन प्रफुल्लीत करता येईल असे काही नसते त्यात. तुम्हाला पटतंय ना? मग तुमच्या विचारांना शब्दात मांडा आणि आम्हाला पाठवा.

या लेखन स्पर्धेत आलेल्या लेखांतून निवडक लेखांचे ईपुस्तक प्रकाशित केले जाईल. १२ जून २०१६ या दिवशी. अनेकांनी भाग घ्यावा यासाठी आपण या स्पर्धेची माहिती अनेकांपर्यंत पोचवून आम्हाला प्रोत्साहन द्यावे हि नम्र विनंती. 


लोभ असावा. 

06 May 2016

#महाराष्ट्रदिन लेखन स्पर्धा - 'पण'

लेखन आणि महाराष्ट्र यांचे घनिष्ट नाते आहे. त्यास तोड नाही. साहित्यातील प्रत्येक प्रकारात मराठी लेखणीने स्वतःचे कर्तुत्व सिद्ध केले आहे. जगभरातील वाचक वर्गाने ते अनुभवले आहे. उपजत क्षमातेशिवाय कर्तबगारी होणे अशक्यच. मराठी भाषेची कर्तबगारी तिच्या मुलभूत साधेपणात तसेच विकसनशील स्वरुपात आहे. भाषेतून होणाऱ्या  अभिव्यक्तीसाठी लिहिणे व बोलणे हे दोन मार्ग सर्वज्ञात आहेत. पण जितक्या प्रमाणात भाषा बोलण्याने समृद्ध होते तितक्याच प्रमाणत किंवा क्वचित जास्तच ती लिखाणाने समृद्ध होते.
लिहिताना फक्त शब्दांच्या माध्यमाने संपूर्णतः व्यक्त व्हायचे असते, आपले मत पटवून द्यायचे असते, आपल्या शब्दांच्या माध्यमातून वास्तविक व काल्पनिक या दोन्ही जागांचा अनुभव वाचणाऱ्याला करून द्यायचा असतो. त्यामुळे ‘लिहिणे’ जास्त आव्हानात्मक असते.

जनसामान्यांच्या लेखन कलेला किंवा एकंदरीत शब्दांच्या माध्यमाने व्यक्त होण्याच्या उपजत भावनेला आम्ही ‘लेखन स्पर्धे’च्या निमित्ताने आवाहन केले. प्रयोजन होते १ मे ला साजरा होणारा ‘महाराष्ट्र दिना’चे. या दिवसाच्या निमित्ताने मराठी मनाचा मागोवा घेण्यासाठी महाराष्ट्राशी थेट संबंधित विषय घेतले. ‘हे विषय मनाला भिडतील’ असे अनेकांनी कौतुक करून उमेद दिली. समाजमाध्यमांचा वापर करून स्पर्धेची माहिती पोचवत गेलो, लेख मिळत गेले. ट्विटर व फेसबुक वर अनेकांनी प्रोत्साहन दिले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्यामुळेच या स्पर्धेची माहिती हजारो लोकांपर्यंत पोचली. म्हणून हे पुस्तक देखील आम्ही त्या प्रत्येकाला सप्रेम अर्पण केले आहे.

चांगल्या संकल्पनांना प्रतिसाद मिळतो हेच यातून सिद्ध झाले. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी मनातील भावना शब्दरूपात मांडल्या.
जर का आपल्याला वाचन संस्कृती वाढवायची असेल तर आपल्याला लेखन संस्कृतीला प्रोत्साहन दिलेच पाहिजे.
बदलत्या समजरचना, नात्यांचे बदलते संदर्भ, वैयक्तिक, भावनिक, सामाजिक गरजा, वैश्विक स्तरावर विस्तारलेला वाचक वर्ग तसेच उपलब्ध बाजारपेठ हे किंवा असे अनेक संदर्भ लक्षात घेऊन लिखाण कौशल्य वाढवायला निश्चित उपाययोजनांची गरज आहे.
ईबू च्या माध्यमाने आम्ही लेखनकलेला तसेच लेखकांना उत्तेजन देणारे उपक्रम करतच राहू. तरी आपल्याकडे काही संकल्पना असल्यास आम्हाला त्यात सहभागी होण्यास आनंद होईल.
या लेखनस्पर्धेच्या निमित्ताने अनेकांनी जे सहकार्य केले व समाजमाध्यमावर जे प्रोत्साहन दिले त्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा मनापासून आभार.

लोभ असावा.
शैलेश खडतरे

या लेखन स्पर्धेत आलेल्या लेखांचे व काव्याचे 'पण' हे ईपुस्तक येथे उपलब्ध आहे. 

वाचा आणि अत्याधुनिक वाचनअनुभितीचा आनंद घ्या व प्रतिक्रिया कळवा.