06 May 2016

#महाराष्ट्रदिन लेखन स्पर्धा - 'पण'

लेखन आणि महाराष्ट्र यांचे घनिष्ट नाते आहे. त्यास तोड नाही. साहित्यातील प्रत्येक प्रकारात मराठी लेखणीने स्वतःचे कर्तुत्व सिद्ध केले आहे. जगभरातील वाचक वर्गाने ते अनुभवले आहे. उपजत क्षमातेशिवाय कर्तबगारी होणे अशक्यच. मराठी भाषेची कर्तबगारी तिच्या मुलभूत साधेपणात तसेच विकसनशील स्वरुपात आहे. भाषेतून होणाऱ्या  अभिव्यक्तीसाठी लिहिणे व बोलणे हे दोन मार्ग सर्वज्ञात आहेत. पण जितक्या प्रमाणात भाषा बोलण्याने समृद्ध होते तितक्याच प्रमाणत किंवा क्वचित जास्तच ती लिखाणाने समृद्ध होते.
लिहिताना फक्त शब्दांच्या माध्यमाने संपूर्णतः व्यक्त व्हायचे असते, आपले मत पटवून द्यायचे असते, आपल्या शब्दांच्या माध्यमातून वास्तविक व काल्पनिक या दोन्ही जागांचा अनुभव वाचणाऱ्याला करून द्यायचा असतो. त्यामुळे ‘लिहिणे’ जास्त आव्हानात्मक असते.

जनसामान्यांच्या लेखन कलेला किंवा एकंदरीत शब्दांच्या माध्यमाने व्यक्त होण्याच्या उपजत भावनेला आम्ही ‘लेखन स्पर्धे’च्या निमित्ताने आवाहन केले. प्रयोजन होते १ मे ला साजरा होणारा ‘महाराष्ट्र दिना’चे. या दिवसाच्या निमित्ताने मराठी मनाचा मागोवा घेण्यासाठी महाराष्ट्राशी थेट संबंधित विषय घेतले. ‘हे विषय मनाला भिडतील’ असे अनेकांनी कौतुक करून उमेद दिली. समाजमाध्यमांचा वापर करून स्पर्धेची माहिती पोचवत गेलो, लेख मिळत गेले. ट्विटर व फेसबुक वर अनेकांनी प्रोत्साहन दिले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्यामुळेच या स्पर्धेची माहिती हजारो लोकांपर्यंत पोचली. म्हणून हे पुस्तक देखील आम्ही त्या प्रत्येकाला सप्रेम अर्पण केले आहे.

चांगल्या संकल्पनांना प्रतिसाद मिळतो हेच यातून सिद्ध झाले. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी मनातील भावना शब्दरूपात मांडल्या.
जर का आपल्याला वाचन संस्कृती वाढवायची असेल तर आपल्याला लेखन संस्कृतीला प्रोत्साहन दिलेच पाहिजे.
बदलत्या समजरचना, नात्यांचे बदलते संदर्भ, वैयक्तिक, भावनिक, सामाजिक गरजा, वैश्विक स्तरावर विस्तारलेला वाचक वर्ग तसेच उपलब्ध बाजारपेठ हे किंवा असे अनेक संदर्भ लक्षात घेऊन लिखाण कौशल्य वाढवायला निश्चित उपाययोजनांची गरज आहे.
ईबू च्या माध्यमाने आम्ही लेखनकलेला तसेच लेखकांना उत्तेजन देणारे उपक्रम करतच राहू. तरी आपल्याकडे काही संकल्पना असल्यास आम्हाला त्यात सहभागी होण्यास आनंद होईल.
या लेखनस्पर्धेच्या निमित्ताने अनेकांनी जे सहकार्य केले व समाजमाध्यमावर जे प्रोत्साहन दिले त्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा मनापासून आभार.

लोभ असावा.
शैलेश खडतरे

या लेखन स्पर्धेत आलेल्या लेखांचे व काव्याचे 'पण' हे ईपुस्तक येथे उपलब्ध आहे. 

वाचा आणि अत्याधुनिक वाचनअनुभितीचा आनंद घ्या व प्रतिक्रिया कळवा.

No comments:

Post a Comment